देशाभरात 15 नोव्हेम्बर पासून रेलवे गाड्यांची प्रवासी वाहतूक सामान्य करण्यात आलेली आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्रीय रेलवे ने आपापल्या क्षेत्रातील प्रवाश्याना द्वितीय श्रेणीतिल अनारक्षित तिकिट उपलब्ध करून दिलेले आहेत आणि सामान्य गाड़यां ही सुरु केलेल्या आहेत. परंतु मध्य रेलवे म्हणजे म रे, ‘रोज मरे त्यास कोण रडे?’
कालच मध्य रेल्वेने आपल्या चाळीसगाव – धुळे मार्गावर 2 जोड्या अनारक्षित मेमू सेवा चालवण्याची घोषणा केली आहे आणि यामुळे संपूर्ण मध्य रेल्वेवर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला आहे. आजही मध्य रेल्वेच्या अनेक भागात स्थानिकांसाठी व रोज प्रवास करणाऱ्यासाठी गाड्या उपलब्ध नाहीत आणि जे काही आहे ते एकतर आरक्षित पद्धतीने चालवले जात आहे किंवा मोजक्याच सेवा दिल्या जात आहेत. उदाहरणार्थ भुसावळ बडनेरा भुसावळ ही एकच मेमू, भुसावळ बडनेरा नागपूर मार्गावर धावत आहे. दुसऱ्या भागात बडनेरा-नरखेड आणि अमरावती-नागपूर चालवण्यात येत आहे. संक्रमणपूर्व काळात भुसावल हुन भुसावळ ते नरखेड, वर्धा आणि नागपूर अशा तीन जोडी गाड्या धावत होत्या.
त्याचवेळी भुसावळ-खंडवा-इटारसी मार्गावर ही अशीच दुरावस्था झालेली आहे. मेमू एक्स्प्रेस म्हणून फक्त एक ट्रेन सुरू करण्यात आली आहे, तर आधी या मार्गावर दैनंदिन प्रवाशांसाठी 2 जोडी प्रवासी गाड्याही धावत होत्या. सर्वात वाईट अवस्था भुसावळ-मनमाड-मुंबई रस्त्याची आहे. या मार्गावर भुसावळ देवळाली ते भुसावळ मुंबई दरम्यान प्रत्येकी एक-एक गाड्या धावत होत्या, गेल्या पावणे दोन वर्षांपासून बंद असून आजतागायत सुरू होण्याची चिन्हे नाहीत. मनमाड इगतपुरी दरम्यानची शटलही बंद आहे. 11025/26 भुसावळ-पनवेल-पुणे दरम्यान दररोज धावणारी हुतात्मा एक्स्प्रेस अद्याप सुरू झालेली नाही. विशेष म्हणजे राज्य सरकारने दिलेल्या परवानगी पत्रातही ही गाड़ी सुरू करण्याचा उल्लेख होता.
स्थानिक प्रवाशांची अवस्था अत्यंत कठीण झालेली आहे. मुख्य मार्गावरील गाड्यांमध्ये द्वितीय श्रेणी अनारक्षित श्रेणी सुरू केली जात नाही. यामुळे सर्वसामान्य प्रवासी, रोजचा प्रवासी अखेर त्यांच्या रोजगारापर्यंत कसा पोहोचेल? महाराष्ट्रात तर राज्य परिवहनच्या बसेसही संपावर आहेत. एकीकडे भुसावळ मंडळच्या वाणिज्य विभागाला मध्य रेल्वेच्या मुख्यालयातून सुमारे आठ कोटींचा दंड वसूल करण्यात आला म्हणून मानाची ढाल का क़ाय ते बक्षीस देण्यात आले आहे. येथील सर्वसामान्य प्रवासीला तिकिटांअभावी दंड भरून प्रवास करावा लागत असून रेलवे तो वसूल करणाऱ्यांचा सत्कार व बक्षिसे वाटत आहे. मोठा लाजीरवाणा प्रकार आहे. हाच पुरस्कार प्रवासी सेवेसाठी दिला गेला असता तर किती अभिमान वाटला असता?
मनमाड-दौंड-पुणे, पुणे-सोलापूर-वाडी, पुणे-सांगली- कोल्हापूर या मार्गावरील प्रवाशांचीही किंबहुना हीच परिस्थिती आहे. म्हणजेच मध्य रेल्वेच्या या वृत्तीने मध्य रेल्वेच्या सर्वच गैर-उपनगरीय भागातील प्रवासी प्रचंड नाराज आहेत. विशेष म्हणजे अनेक प्रश्नांची उत्तरे न देण्याचा रेल्वे प्रशासनाचा स्वभाव बनला आहे.