दिनांक 28 जानेवारीला मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा भुसावळ विभागमधे तपासणी दौरा सम्पन्न झाला. मनमाड ते नाँदगाव हाय स्पीड निरीक्षण आणि जळगाव, भादली पर्यंत विविध कार्यालयीन कामकाजाचे निरीक्षण केले गेले. भुसावळमधे रनिंग रेल्वे स्टाफ, लोको पायलट, ट्रेन मैनेजर टि टि ई वगैरे करीता पाच मजली अत्याधुनिक रनिंग रूम चे उद्धाटन करण्यात आले. तसेच दिल्ली येथील नैशनल रेल म्यूजियमच्या धर्तीवर बनविण्यात आलेले मिनी रेल म्यूजियम चे ही उद्धाटन करण्यात आले.


भुसावळ विभागात महाव्यवस्थापक येणार तेव्हा स्थानिक पत्रकार आपापल्या भागातील लोकांच्या समस्या, प्रश्न हाताशी घेऊन, सरसाऊन बसलेली होती. मात्र सायंकाळी सहा वाजेच्या वेळचे लांबत लांबत पार आठ/साडे आठ वाजले तरी पत्रपरिषदेला मुहूर्त लागत नव्हता. तेव्हा स्थानिक पत्रकारांनी सरळ पत्रपरिषदेचा बहिष्कार केला आणि जी फ़ीड विभागीय कार्यालयाकडून मिळेल त्यावर बातमी बनवण्यावर भर दिला. यामुळे जे जे काही स्थानिक प्रश्न महव्यवस्थापकांपुढे उपस्थित केले जाणार होते त्याला आपसूकच वाटाण्याच्या अक्षता लागल्या.
स्थानिक प्रवासी, रोज अप-डाउन करणारे हजारों लोकं मासिक पासच्या अभावी हैराण झालेले आहेत. मेल/एक्स्प्रेस गाड्यांत द्वितीय श्रेणी जनरल तिकीट उपलब्ध नाही, पुरेश्या गाड्या नाहीत, विभागाच्या एकेक मार्गावर ईगतपुरी – भुसावळ, बड़नेरा – भुसावळ, खंडवा – भुसावळ मार्गावर केवल एकेकच मेमू गाड़ी सुरू आहे. उर्वरित गाड्यांची, जनता तिव्रतेने मागणी करत आहे. भुसावळ मार्गे चालणारी मध्य रेल्वेची एकमेव राजधानी एक्स्प्रेस पण तिला भुसावळला थांबा नाही. सध्या ह्या गाड़ीला भुसावळहून रनिंग स्टाफ म्हणजे लोको पायलट, सह लोको पायलट, ट्रेन मैनेजर (गार्ड) भुसावळ हुन जळगावला नेला/आणला जात आहे. एकीकडे रेल्वे अतिरिक्त खर्च वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे रनिंग स्टाफला भुसावळ ऐवजी जळगावला नेण्यात कोणती बचत साधली जातेय? अतिक्रमण उठवून अनेक वर्ष लोटली परंतु अजूनही रिकाम्या जागेवर रेल्वेचे कारखाने वा उद्योग आणले गेलेले नाही, भुसावळमधे साकार होत असलेली ‘रेल नीर’ फैक्टरी अजून ही सुरू झालेली नाही. असे अनेक प्रश्न अनुत्तरितच राहून गेलेले आहेत.