गाजर हे खरचं दाखवण्यापुरते असते आणि सध्या त्याचा रेल्वे गाडयांच्या बाबतीत सुयोग्य वापर सुरू असलेला दिसतो. त्याचे कारण असे आहे मित्रांनो, गेल्या दोन वर्षात देशभरात संक्रमणाने जो कोण कहर केला होता आणि त्यानिमित्ताने आपल्या काळजीपोटी रेल्वे विभागाने त्यांच्या सर्व प्रवासी गाड्या देखील बन्द करून टाकल्या होत्या. गेल्या वर्ष दीड वर्षात हळू हळू का होईना पण बऱ्याचशा गाड्या मार्गी लागलेल्या आहेत.
आता मग माशी शिंकली कुठे? अहो आपल्या विदर्भात, विदर्भ म्हणजे महाराष्ट्र मधील एक प्रान्त. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोंकण विभाग तसाच विदर्भ. पण अनास्था बघा, महाराष्ट्राच्या विदर्भात चंद्रपूर हा जिल्हा, भारतीय रेल्वेच्या ग्रैंड ट्रंक अश्या महत्वपूर्ण असलेल्या दिल्ली – चेन्नई मार्गावरील बल्हारशहा हे प्रमुख रेल्वे स्टेशन आणि जंक्शन चंद्रपूरच्या अगदी जवळ. मुम्बई या महाराष्ट्र च्या राजधानीशी रेल्वे मार्गाने व्यवस्थितरित्या जोडलेले हे शहर. एक दररोज धावणारी बल्हारशहा – वर्धा – मुम्बई सेवाग्राम लिंक एक्सप्रेस आणि दोन मुम्बई ते बल्हारशहा आनंदवन आणि ताडोबा साप्ताहिक एक्स्प्रेस गाड्या परंतु साहेब, ही जुनी गोष्ट झाली हो. सध्या एक ही सरळ गाड़ी मुम्बई आणि चंद्रपूर यांच्या दरम्यान धावत नाही.
रेल्वे विभागाने मध्यंतरी देशभरातुन सर्व लिंक एक्स्प्रेस गाड्या बंद केल्या त्यांना रेल्वे स्टेशनावरचे शंटिंग आणि त्यामुळे वाया जाणारा वेळ, मानवी श्रम वाचवयाचे होते. त्यात ही आपली चंद्रपूर ची लाड़की आणि सोईची सेवाग्राम लिंक एक्सप्रेस बळी गेली, बन्द करण्यात आली. संक्रमणमधे बंद केल्या गेलेल्या आनंदवन एक्स्प्रेस आणि ताडोबा एक्स्प्रेस परत कधी ही म्हणजे आजवर देखील सुरू झालेल्या नाहीत.




ही बाब रेल्वे अधिकारी म्हणा वा जनप्रतिनिधि म्हणा यांच्या लक्षात आली व त्यानी दादर ते बल्हारशहा अशी चंद्रपूरला मुम्बईशी सरळ जोडणारी आठवड्यातुन दोन दिवस चालेल अश्या एक सुट्टी विशेष गाड़ीची योजना तयार केली. ही गाड़ी जर प्रवासीच्या पसंतीस उतरली तर तिला कायम सुरू ठेवण्याचे ही प्रयोजन विचाराधीन होते. ही दादर बल्हारशहा द्विसाप्ताहिक विशेष गाड़ी 10 एप्रिल पासून दाखल होणार होती. पण शेवटी काय तर ते गाजरच ठरले आणि गाड़ी कुठे हरवली ही काही कळलेच नाही.
एकूण महाराष्ट्राचा विदर्भ विभाग हा रेल्वेच्या बाबतीत असाच दुर्लक्षित राहतो. आजही चंद्रपूर, वाशिम हे असे जिल्हे आहेत की तेथे रेल्वेचे मजबूत आणि व्यवस्थित जाळे असून सुद्धा रेल्वे विभाग मुम्बई या राज्याच्या राजधानी ला जोडणाऱ्या गाड्या देवू शकत नाही हे या भागातील लोकांच दुर्दैव समजाव की जनप्रतिनिधीची अनास्था?